Ladki Bahin Yojana Fund Shift Maharashtra Govt Dispute : महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अनुसूचित जाती आणि जमाती विभागासाठी राखीव ठेवलेला 746 कोटी रुपयांचा निधी वळवण्याच्या निर्णयामुळे सत्ताधारी आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. हा निर्णय केवळ प्रशासनिक नसून, त्याचे राजकीय पडसाद सरकारच्या आतल्या गोटात उमटू लागले आहेत.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अर्थ विभागाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी ही कृती ‘शकुनी’सदृश असल्याचे सांगत, “जर सामाजिक न्याय विभागाची गरज नसेल, तर मग तो विभागच बंद करून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. शिरसाट हे शिवसेनेचे आमदार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रमुख मंत्री आहेत. त्यांनी यापूर्वीही या विभागातून तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
या प्रकरणावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनीही आपली नाराजी व्यक्त करत ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी पुरेसा निधी आरक्षित नसल्यामुळे इतर खात्यांवर ताण येत असल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, नवीन योजनांसाठी स्वतंत्र तरतूद न करता अन्य विभागांच्या निधीतून पैसे कापणे योग्य नाही.
सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर उपरोधिक टीका करत म्हटले, “शिवसेनेने महाविकास आघाडी सोडलेली कारण त्यांना वाटत होत की, अजित पवार निधी देत नाहीत. आता ते त्याच सरकारमध्ये आहेत, आणि अजित पवार तेच करत आहेत, त्यामुळे आता तक्रार करण्याचा त्यांना अधिकार उरत नाही.”
महायुती सरकारमध्ये निर्माण झालेले अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः सामाजिक न्याय आणि आर्थिक समावेशकतेच्या मुद्द्यांवर सुरु असलेल्या संघर्षामुळे सरकारपुढे नवा पेच उभा राहिला आहे.
🔴 हेही वाचा 👉 PAN कार्डवर मिळत ₹5 लाखांच वैयक्तिक कर्ज.