Citizenship Proof Update 2025 : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड आता भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार, दिल्लीत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्व पडताळणीसाठी केवळ मतदार ओळखपत्र (Voter ID) आणि पासपोर्ट यांनाच वैध दस्तऐवज मानले जाणार आहेत. ही माहिती दिल्ली पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केली आहे.
पाहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायातील अनेक लोक आधार, पॅन आणि रेशन कार्डच्या आधारे बेकायदेशीररीत्या भारतीय नागरिक असल्याचा दावा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या निर्णयामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या व्यापक पडताळणी मोहिमेला वेग मिळाला आहे.
UIDAI ने स्पष्ट केल आहे की आधार कार्ड हे केवळ व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे, नागरिकत्वाचा नाही. तसेच, पॅन कार्ड फक्त कर भरण्यासाठी आणि रेशन कार्ड हे अन्नधान्याच्या सबसिडी साठी वापरले जाते. त्यामुळे या कोणत्याही कागदपत्रांद्वारे नागरिकत्व सिद्ध करता येत नाही.
सरकारने नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट यांना प्राधान्य दिले आहे. जन्म व मृत्यू नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत अधिकृत संस्थांकडून जारी केलेले जन्म प्रमाणपत्र हे भारतात जन्म झाल्याचा पुरावा आणि अप्रत्यक्षपणे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मानले जाईल.
यासोबतच, केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले बहुतांश व्हिसा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ वैद्यकीय, राजनैतिक किंवा दीर्घकालीन (LTV) व्हिसा असलेल्यांना यामधून सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलनंतर अवैध ठरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांना दिल्लीत असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ भारतातून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, दीर्घकालीन व्हिसावर भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू पाकिस्तानी नागरिकांना या निर्णयापासून वगळण्यात आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये? लवकरच घोषणा अपेक्षित.