Gharkul Yojana 2025 : “एकही बेघर लाभार्थी वंचित राहू नये” – पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धार

2 Min Read
Gharkul Yojana 2025 Housing Scheme Jaykumar Gore Maharashtra Din 2025

सोलापूर | १ मे: प्रधानमंत्री आवास योजनेचा (PM Awas Yojana 2025) लाभ जिल्ह्यातील प्रत्येक बेघर कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेनिमित्त पोलिस परेड ग्राउंड, सोलापूर येथे पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.

मंत्री गोरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात (Gharkul Yojana 2025) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ६२,९५० घरकुलांचे मंजुरी आदेश देण्यात आले असून, ‘आवास प्लस २०२४’ या सर्वेक्षणाचही काम सुरू आहे. त्यामुळे कोणताही बेघर नागरिक वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी.”

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, घरकुल बांधकामासाठी राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ३५ हजार रुपये घरकुलासाठी तर १५ हजार रुपये ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहेत. एकूण २.०८ लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हा प्रशासनाने ‘१०० दिवस कृती आराखडा’ अंतर्गत सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवला असून, आता या उपक्रमाची तृतीय पक्ष तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. प्रशासनाने यानंतरही नागरिकांना दर्जेदार सेवा देणे सुरू ठेवावे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सोलापूर शहरात “उमेद मॉल” स्थापन केला जाणार असून, यासाठी २०२५-२६च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महिला उद्योजिकांना वर्षभरासाठी हक्काची विक्री व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेसाठी २०२४-२५ मध्ये मंजूर ७०२ कोटींपैकी ९९.७४% निधीचा वापर झालेला आहे. तर २०२५-२६ साठी जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण २३८ कोटी रुपयांचे नुकसानभरपाईचे वाटप ४.२५ लाख शेतकऱ्यांमध्ये करण्यात आले आहे.

लखपती दीदी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १.२५ लाख महिलांना उद्योजिका म्हणून यश मिळाले असून, ४५३ कोटी रुपयांचे बँक कर्ज त्यांना वितरित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात पूर्ण झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

🔴 हेही वाचा 👉 ई-श्रम कार्ड म्हणजे काय? याचा काय फायदा.

Share This Article