लाडकी बहिण योजनेचा एप्रिल हप्ता बँक खात्यांत जमा; मात्र निधी वळवणीवरून वाद निर्माण
Ladki Bahin Yojana April Installment Fund Diversion Controversy : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत एप्रिल 2025 महिन्याचा हप्ता शुक्रवारपासून पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेसाठी सरकारने अनुसूचित जाती व आदिवासी विकास विभागाच्या योजनांसाठी राखीव ठेवलेला सुमारे 746 कोटी रुपयांचा निधी वळवला आहे, यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सामाजिक माध्यमांद्वारे ही माहिती दिली की, “लाडकी बहिण योजनेचा सन्मान निधी थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र महिलांना पैसे मिळतील.”
एकनाथ शिंदेंचे आश्वासन, पण निधी कुठून आला?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आश्वासन देत म्हटले होते की, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.” परंतु, आता हे स्पष्ट झाले आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी त्यांच्या भावांनी अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी विकास योजनांमधून अनुक्रमे 410.30 कोटी व 335.70 कोटी रुपये वळवले आहेत.
राज्याच्या 2025-26 अर्थसंकल्पात अनुसूचित जातींसाठी 22,658 कोटी, तर आदिवासींसाठी 21,495 कोटींची तरतूद केली होती. मात्र, सध्याच्या निधीवळवणीमुळे ह्या समाजासाठीच्या योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महिला सशक्तीकरण की सामाजिक न्यायाचा बळी?
महिला सक्षमीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा दावा केला जात असला, तरी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीतून पैसे वळवण्यावर अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. लाडकी बहिण योजनेचा दरमहा 1500 रुपयांचा हप्ता कायम राहावा, यासाठी आता दरमहा इतर विभागांतून निधी वळवण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही पुढे आली आहे.
🔴 हेही वाचा 👉जन्म दाखला नसला तरीही आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करता येते, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.