Ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अनुदानासंदर्भात हप्ता मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काही लाभार्थी महिलांनी थेट पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आहे. सरकारने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत, महिलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अक्षय्य तृतीयेला हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांचा हिरमोड
राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळण्याची तरतूद आहे. एप्रिल महिन्याचा १० वा हप्ता अक्षय्य तृतीयेला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तो देखील अजून न मिळाल्याने महिला लाभार्थींमध्ये संतापाचे वातावरण आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना यापूर्वी १५०० रुपयांचे हप्ते मिळाले असून, सध्या सरकारने अशा महिलांना केवळ ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.
पोलिस ठाण्यात थेट फसवणुकीची तक्रार
श्रीरामपूर येथील अहिल्यानगरमध्ये काही शेतकरी महिलांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप करण्यात आले आहेत. महिलांनी गुन्हा नोंदवण्याची मागणीही केली.
अनुदानाचे आश्वासन आणि सध्याची स्थिती
निवडणुकीच्या आधी सरकारकडून दरमह २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर ना २१०० रुपये मिळाले, ना आधीचे १५०० रुपये सुरू राहिले. उलट, ‘शेतकरी सन्मान निधी योजने’चा लाभ घेणाऱ्या महिलांचे १५०० रुपयांचे अनुदान थांबवण्यात आले असून, लाडकी बहीण योजनेतून त्यांना सध्या फक्त ५०० रुपये दरमहा देण्यात येत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 1 मेपासून देशातील १५ ग्रामीण बँका होणार बंद; कोणते बदल अपेक्षित?.