Post Office Digital Investment Update : केंद्र सरकारच्या पोस्ट कार्यालयाच्या विविध बचत योजनांमध्ये आता डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. आधार ई-केवायसी प्रणालीच्या माध्यमातून ग्राहक आता कोणत्याही कागदपत्राशिवाय पीपीएफ (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) यामध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट विभागाने यासाठी एक नवीन प्रणाली सुरू केली असून, याद्वारे ग्राहकांना ऑनलाइन डिपॉझिट व्हाउचर आणि फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे फॉर्म डिजिटल व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून वापरता येतात. विशेष म्हणजे, आधार क्रमांकाच्या गोपनीयतेसाठी पोस्ट कार्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत – कोणत्याही अर्जावर आधार क्रमांक दिसू नये यासाठी पहिले ८ अंक काळे करण्याचे निर्देश पोस्टमास्तरांना देण्यात आले आहेत.
या नव्या प्रणालीचा विस्तार आता मासिक बचत योजना (RD), मंथली इनकम स्कीम (MIS), टाइम डिपॉझिट (TD), किसान विकास पत्र (KVP) आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) यासारख्या योजनांपर्यंतही करण्यात आला आहे.
बायोमेट्रिक ई-केवायसीची प्रक्रिया
ग्राहक जेव्हा खाते उघडतो, तेव्हा सहाय्यक कर्मचाऱ्याच्या मदतीने आधार क्रमांकाद्वारे बोटांचे ठसे घेऊन ई-केवायसी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर खातेदाराची माहिती प्रणालीत भरली जाते व खात्याची अंतिम पुष्टी पुन्हा एकदा बायोमेट्रिकद्वारे होते. त्यामुळे पे-इन व्हाउचर भरायची गरज उरत नाही आणि संपूर्ण प्रक्रिया जलद होते.
सुरक्षिततेसाठी आधार बायोमेट्रिक लॉक सुविधा
आधार प्रणालीत बायोमेट्रिक लॉक/अनलॉक सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे ग्राहक आपल्या बायोमेट्रिक डेटावर नियंत्रण ठेवू शकतो, आणि आवश्यकतेनुसार ती माहिती लॉक किंवा अनलॉक करू शकतो.
या नव्या डिजिटल प्रणालीमुळे पोस्ट सेवांमध्ये पारदर्शकता, गती आणि सुरक्षितता वाढली आहे, तसेच सामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये; पात्रता, अटी व नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.