Rules Changing in May 2025 : नवीन महिन्याची सुरुवात नेहमीच काही नव्या बदलांसह होते. १ मे २०२५ पासून देशभरातील काही महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. यात एटीएममधून पैसे काढणे, रेल्वे प्रवासाचे नियम, एलपीजी सिलिंडरचे दर आणि बँकांच्या व्याजदरांचा समावेश आहे.
एटीएम व्यवहारावर अतिरिक्त शुल्क
१ मेपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या विनामूल्य व्यवहार मर्यादेनंतर अधिक शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत अतिरिक्त व्यवहारासाठी १७ रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता ते वाढवून १९ रुपये प्रति व्यवहार करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम वापरताना मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे.
रेल्वे प्रवासाचे बदललेले नियम
रेल्वे मंत्रालयाने १ मेपासून स्लीपर आणि एसी डब्यांमधील वेटिंग तिकिटांवरील प्रवासास बंदी घातली आहे. यानंतर, वेटिंग तिकिटधारकांना फक्त जनरल डब्यांमध्येच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
गॅस सिलिंडर दरांमध्ये होऊ शकतो बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर रिव्हाइज करतात. त्यामुळे १ मे रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
एफडी आणि बचत खात्यांच्या व्याजदरात बदलाची शक्यता
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने दोन वेळा रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे अनेक बँकांनी एफडी आणि सेव्हिंग खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ही प्रक्रिया मे महिन्यातही सुरू राहण्याची शक्यता असून, अनेक बँका आपली व्याजदर प्रणाली पुन्हा रिव्हाइज करू शकतात.
🔴 हेही वाचा 👉 एक रुपयात पीकविमा योजना बंद; कशी असणार नवीन पीकविमा योजना?.